गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीटंचाईवर आढावा बैठक; खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचे तत्काळ उपाययोजनांचे निर्देश

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात आज पाणीटंचाईच्या मुद्द्यावर एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीला लोकसभा खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील विविध गावांमध्ये उद्भवलेल्या पाणीटंचाईच्या समस्येवर तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश खासदार डॉ. पडोळे यांनी जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांना दिले.

बैठकीदरम्यान खासदार डॉ. पडोळे यांनी जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांची यादी सादर करत, पिण्याच्या पाण्यासह जनावरांसाठी लागणाऱ्या पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचे आवाहन केले. “जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्राधान्याने उपलब्ध करून द्यावी. जिथे माझ्या सहकार्याची गरज असेल, तिथे मी पूर्णपणे सहकार्य करेन,” असे खासदार पडोळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांनी बैठकीत पाणीटंचाईच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला आणि केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांद्वारे पाणीपुरवठा वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. यावेळी त्यांनी जल जीवन मिशन आणि मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांचाही उल्लेख केला.

खासदार डॉ. पडोळे यांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी विशेषत: ग्रामीण भागातील शाळा, आंगणवाड्या आणि सर्वसामान्य जनतेसाठी स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यावर भर दिला.

या बैठकीला जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पाणीटंचाईच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही सुरू केली असून, लवकरच याबाबत ठोस पावले उचलली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment