गोंदिया: क्रीडा साहित्य निविदा घोटाळ्याप्रकरणी जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खरपुडे निलंबित

गोंदिया जिल्ह्यात क्रीडा साहित्याच्या निविदा प्रक्रियेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खरपुडे यांना निलंबित करण्यात आले आहे. क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासनाने 13 मे 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता याबाबतचे निलंबन आदेश जारी केले. नंदा खरपुडे यांच्यावर भ्रष्टाचार आणि लाचखोरीचे गंभीर आरोप असून, त्यांच्या कार्यकाळात अनेक वादग्रस्त प्रकरणे समोर आली आहेत.

प्राप्त माहितीनुसार, नंदा खरपुडे यांनी गोंदियात क्रीडा साहित्य खरेदीसाठी निविदा प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन केले. क्रीडा संचालकांच्या आदेशांचे पालन न करता त्यांनी मनमाने साहित्य खरेदीचे आदेश जारी केले. यासंदर्भातील तक्रारी क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाकडे प्राप्त झाल्यानंतर चौकशी करण्यात आली. चौकशीत खरपुडे दोषी आढळल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या नागरिक सेवा नियम 1979, नियम 4, उपनियम 1, कलम (अ) अंतर्गत त्यांना निलंबित करण्यात आले. निलंबन कालावधीत त्यांना कोणत्याही प्रकारची वैयक्तिक नोकरी किंवा व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे.

नंदा खरपुडे यांचा भ्रष्टाचाराचा इतिहास नवा नाही. यापूर्वी बीड येथे जिल्हा क्रीडा अधिकारी असताना त्यांनी सात व्यायामशाळांना अनुदान देण्यासाठी 2 लाख रुपयांची लाच मागितली होती. यापैकी 80,000 रुपये त्यांनी एका परिचारिकेमार्फत स्वीकारले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लातूर येथील त्यांच्या निवासस्थानाची झडती घेतली असता 11 लाख 37 हजार रुपयांची रोख रक्कम आणि दागिने जप्त केले होते. तसेच, यवतमाळ येथेही त्यांनी जिम्नॅस्टिक प्रशिक्षक एन. डब्ल्यू. खरपुडे यांच्यासह खेळाडू नसताना 95 लाख रुपयांचे क्रीडा साहित्य खरेदी करून लाखो रुपयांची लाचखोरी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

गोंदियातील त्यांचा कार्यकाळही वादग्रस्त ठरला आहे. क्रीडा साहित्य खरेदीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार, लाचेची मागणी आणि क्रीडा संकुलात मनमानी आदेश जारी करण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. यामुळे स्थानिक खेळाडूंना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सदर माहिती 15 मे 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्राप्त झाली. नंदा खरपुडे यांच्या निलंबनामुळे गोंदियातील क्रीडा क्षेत्रात पारदर्शकता येण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

1 thought on “गोंदिया: क्रीडा साहित्य निविदा घोटाळ्याप्रकरणी जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खरपुडे निलंबित”

Leave a Comment